Latest Post

हिंदुस्थान : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवडक विचार

Written By Admin on Tuesday, October 4, 2011 | 7:51 AM

'हिंदुस्थान' या विषयावरील सावरकरांचे निवडक विचार त्यांच्याच शब्दांत संदर्भासहित येथे दिलेले आहेत.

आपल्या देशाचे प्राचीन नाव - सप्तसिंधू वा सिंधू
आपल्या देशाचे सर्वात प्राचीन नाव, ज्याविषयी आपणापाशी आधार आहे, ते सप्तसिंधू वा सिंधू आहे. भारतवर्ष हे नावसुध्दा नंतरचे अभिधान आहे. आणि त्याचे आवाहन व्यक्तिविषयक आहे. मनुष्य कितीही महान् असो, जसजसा काळ जातो तसतसा त्याचा गौरव कमी कमी होत जातो. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : १९)
सिंधू शब्दाने देशाच्या सीमांचा बोध
संस्कृतमधील सिंधू शब्दाने सिंधू नदीचाच नव्हे तर समुद्राचा - 'समुद्र रशना' दक्षिण द्वीपकल्पाला परिवेष्टणार्‍या समुद्ररशनेचा बोध असल्यामुळे हा एक शब्द आपल्या देशाच्या जवळ जवळ सर्व सीमा दर्शवितो. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : २०)
हिंदुस्थान हे देशाचे नाव सर्व नावांत समर्पक
हिंदुस्थान ह्या शब्दाने मुख्य राजकीय व सांस्कृतिक विधेय वक्तृत्वपूर्णपणे प्रकट होते तितके आर्यावर्त, दक्षिणापथ, जंबुद्वीप आणि भारतवर्ष ह्या शब्दांनी होऊ शकत नव्हते. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : २८)
हिंदुस्थान आमची पुण्यभूमी
...ही भारतभूमी, हे सिंधुस्थान, सिंधूपासून सिंधूपर्यंतची ही भूमी आमची पुण्यभूमी आहे. ह्या भूमीत आमच्या धर्मविचारांच्या संस्थापकांना व ऋषींना वेदांचा साक्षात्कार झाला; वैदिक ऋषींपासून ते दयानंदापर्यंत, जिनापासून महावीरापर्यंत, बुध्दापासून नागसेनापर्यंत, नानकापासून गोविंदापर्यंत, बंदापासून बसवापर्यंत, चक्रधरापासून चैतन्यापर्यंत, रामदासापासून राममोहनापर्यंत आमच्या गुरुंनी व धार्मिक पुरुषांनी जन्म घेतला व ते वाढले. तिच्या मार्गातील धुळीत आमच्या प्रेषितांचे व गुरुंचे पदरव ऐकू येतात. तिच्या नद्या व तिची उपवने पवित्र आहेत. कारण चंद्रप्रकाशात त्यांच्या घाटावर किंवा सायंकाळच्या छायेत बुध्दाने किंवा शंकराने जीवन, मनुष्य, आत्मा, ईश्वर, ब्रह्म आणि माया ह्यांच्या गहन प्रश्नांवर वाद व चर्चा केली. प्रत्येक डोंगर व प्रत्येक वृक्षाच्छादित खोरे कपिलाच्या, व्यासाच्या, शंकराच्या व रामदासाच्या स्मृतीने भरलेले आहे. येथे भगीरथ राज्य करतो, येथे कुरुक्षेत्र आहे. वनवासाला जाताना रामचंद्राने पहिला विश्राम येथेच घेतला. तेथेच जानकीने सोनेरी हरिण पाहिला व त्याला मारण्याचा आपल्या प्रियकराशी प्रेमाने हट्ट घरला. ज्या बासरीने गोकुळातील प्रत्येक हृदय मोहनिद्रेत असल्याप्रमाणे एका लयीत नाचू लागेल अशी बासरी त्या दैवी गुराख्याने वाजविली. येथे बोधिवृक्ष आहे व येथे मृगवन आहे. येथेच महावीराला निर्वाण प्राप्त झाले. येथेच भक्तांच्या मेळाव्यात बसून 'गगन थाल रविचंद्र दीपक बने' ही नानकाने आपली आरती म्हटली. येथे गोपीचंद राजाने गोपीचंदजोगी होण्याची प्रतिज्ञा केली व भिक्षापात्र घेऊन मूठभर भिक्षेकरिता आपल्या बहिणीचे दार ठोठावले. येथेच हिंदू म्हणून मरण्याच्या अपराधाकरिता बंदा बहादुराच्या मुलाचे वडिलांच्या डोळयांसमोर तुकडे तुकडे करण्यात येऊन त्याचे हृदय वडीलांच्या तोंडात कोंबण्यात आले. येथील प्रत्येक दगड हौतात्म्याची कथा सांगू शकेल. हे माते ! तुझ्या भूमीचा प्रत्येक तसू यज्ञभूमी आहे. जेथे कृष्णसार सापडले तेथेच नव्हे तर काश्मीर ते सिंहल ही ज्ञानयज्ञाने पवित्र झालेली यज्ञीयभूमी आहे. म्हणून प्रत्येक हिंदूला, मग तो साधू असो वा संताळ ही भारतभूमी, हे हिंदुस्थान पितृभू आणि पुण्यभू आहे. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ७१ - ७२)
हिंदुस्थान ह्या नावाने अहिंदू बांधवांची मानहानी होत नाही.
चीनमध्ये कोटयावधी मुसलमान आहेत. ग्रीस, पॅलेस्टाईन इतकेच काय पण हंगेरी, पोलंडमध्येही त्यांच्या राष्ट्रघटकांत हजारो मुसलमान आहेत पण तेथे ते अल्पसंख्य, केवळ एक जाती आहेत. आणि त्या देशांना त्यांतील मोठया बहुसंख्येने असलेल्या वंशाची वसाहतस्थाने म्हणून रुढ असलेली प्राचीन नावे बदलण्यासाठी तेथे कोणी अल्पसंख्य जातीच्या अस्तित्वाचे कारण पुढे करीत नाही. तेथील मुसलमानांनी ही नावे विकृत केली नाहीत वा करण्यास धजले नाहीत. प्रसंग येताच पोलिश मुसलमान, ग्रीक मुसलमान , किंवा चिनी मुसलमान अशा नावांनी संबोधिले जाण्यात समाधान मानतात. त्याचप्रमाणे आपल्या मुसलमान देशबंधूंनी राष्ट्रीय किंवा प्रादेशिक दृष्टया आपला निर्देश करताना हिंदुस्थानी मुसलमान म्हणून करावा. तसे करण्यात त्यांच्या धार्मिक वा सांस्कृतिक स्वतंत्र अस्तित्वास बाधा येत नाही. - (१९३९ हिं.रा.द., स.सा.वा. ६ : ३५४)
जगाच्या नकाशात हिंदुस्थान चिरंतन खोदून ठेवा
हिंदुस्थान ह्या आपल्या मातृभूमीच्या रुढ नावाने ऋग्वेद काळातील सिंधूपासून आपल्या पिढीतील हिंदू शब्दापर्यंत जी अखंड परंपरा व्यक्त होते तिचा उच्छेद वा तिच्याशी प्रतारणा हिंदूंनी करु नये. जर्मनांचा देश जसा जर्मनी, इंग्रजांचा इंग्लंड, तुर्कांचा तुर्कस्थान नि अफगाणांचा अफगाणिस्थान, त्याचप्रमाणे हिंदूंचा देश म्हणून हिंदुस्थान ह्या नावानेच आपले स्थान जगाच्या नकाशात चिरंतन खोदून ठेविले पाहिजे. - (१९३९ हिं.रा.द., स.सा.वा. ६ : ३५५)
हिंदुस्थान हिंदूंचाच देश
वस्तुत: जो समाज देशात बहुसंख्य असतो त्यांचाच तो देश मानला जाण्याची प्रथा सर्व जगात आहे. या नात्याने तर हिंदुस्थान हिंदूंचा आहेच; पण त्याशिवायही तो हिंदूंचा असल्याचे आणखी एक निश्चित गमक सांगता येईल. ते म्हणजे हिंदुस्थानच्या उध्दाराचा प्रयत्न कोणी केला ते पाहणे, हे होय. या देशाच्या स्वातंत्र्याच्या १८५७ पासून सुरु झालेल्या लढयात कोणी खरा त्याग केला ? - हिंदूंनी का मुसलमानांनी ? - (१९३७ स.सा.वा. ४ : ३३०)

हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत् : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवडक विचार

'हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत्' या विषयावरील सावरकरांचे निवडक विचार त्यांच्याच शब्दांत संदर्भासहित येथे दिलेले आहेत.

हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत्
हिंदू चळवळीची विचारप्रणाली समजण्याकरिता ह्या तीन शब्दांचा अर्थ नीट समजावून घेणे अत्यावश्यक आहे. हिंदू या शब्दापासून इंग्रजीमध्ये 'हिंदुइझम' (हिंदुधर्म) हा शब्द बनविला आहे. त्याचा अर्थ हिंदू लोक ज्या धर्ममतांना वा मार्गांना अनुसरतात ती धर्ममते वा मार्ग. दुसरा शब्द हिंदुत्व हा त्यापेक्षा अधिक संग्राहक शब्द आहे. हिंदुधर्म ह्या शब्दाप्रमाणे हिंदूंच्या केवळ धार्मिक अंगाचा त्यात समावेश होत नसून त्यात हिंदूंच्या सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक व राजकीय अंगांचाही समावेश होतो. 'Hindu Polity' ह्या इंग्रजी शब्दाशी तो जवळ जवळ समानार्थी शब्द आहे. त्याचे जवळ जवळ तंतोतंत भाषांतर Hinduness ह्या शब्दाने करता येईल. हिंदू जगत् Hindudom ह्या तिसर्‍या शब्दाचा अर्थ संकलितपणे हिंदू म्हणून संबोधिले जाणारे सर्व लोक. ज्याप्रमाणे इस्लामने मुसलमानी जगताचा किंवा ख्रिश्चनडम ह्या शब्दाने ख्रिस्ती जगताचा बोध होतो त्याप्रमाणे ह्या शब्दाने हिंदुजगताचा सामुदायिक बोध होतो. - (१९३८ हिं.रा.द., स.सा.वा. ६ : ३५०)
'हिंदू' शब्दाची उत्पत्ती
... आपल्या वंशाच्या मूळ पुरुषांनी आपल्या राष्ट्राला व आपल्या लोकांना देण्याकरिता जे पहिले आणि जवळ जवळ पाळण्यातले नाव निवडले ते सप्तसिंधू अथवा हप्त हिंधू आहे. आणि त्या जगातील जवळ जवळ सर्व राष्ट्रे आपणांस ह्याच सिंधू किंवा हिंदू हयाच नावाने ओळखत असत. - (१९२३ हिं.,स.सा.वा. ६ : ५)
हिंदू हा शब्द आपणांस अरबांनी दिलेला नाही
महंमदाच्या जन्मापूर्वी, नव्हे अरब हे एक 'लोक' म्हणून ओळखले गेल्यापूर्वी हे प्राचीन राष्ट्र आपणांकडून व इतरांकडून सिंधू वा हिंदू ह्या स्वाभिमानी नावाने ओळखले जात होते. अरबांनी सिंधू नदीचा शोध लावला हे म्हणणे जितके खरे तितके अरबांनी ह्या शब्दाचा शोध लावला हे म्हणणे आहे. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ४६)
हिंदू शब्दाची व्याख्या
आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: ॥
- (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ७५)
सिंधुस्थान ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे तो हिंदू. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ७४)
हिंदू ह्या दोन अक्षरांत
हे आमचे एकजीवन आज ज्या एकाच शब्दात नवीन व्याख्येप्रमाणे व्यक्तविता येते तो अनन्य शब्द आहे 'हिंदू' ! या शब्दाच्या 'हिंदू' या दोन अक्षरांत अगस्तीच्या अंजलीत महासागर तसे तीस कोटी लोकांचे राष्ट्रचे राष्ट्र सामावलेले आहे. - (स.सा.वा.२:४२९)
हिंदुत्व हा एक शब्द नव्हे, तो इतिहास आहे. -(१९२३ हिं., स.सा.वा. ६ : २)
हिंदुत्वाचे स्फुल्लिंग जागृत ठेवा
अग्निहोत्री ज्याप्रमाणे यज्ञकुंडात अग्नी प्रज्वलित ठेवतो त्याप्रमाणे तुम्ही हिंदुत्वाच्या भावनेचे स्फुल्लिंग जतन करुन ठेवा. योग्य वेळ येताच त्याला फुंकर घालून भरतखंडभर हिंदुत्वाचा डोंब उसळून दिला की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदुत्वाच्या भावनेने जनता भारली जाईल. - (१९४१ अ.हिं.ल.प.पृ. १४३)
हिंदुधर्म
'हिंदुधर्म' हे नाव कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे वा पंथाचे विशेष नि अनन्य नाव नसून ज्या अनेक धर्मांची नि पंथांची ही भारतभूमी हीच पितृभूमी नि पुण्यभूमी आहे त्या सार्‍यांना समावेशिणार्‍या धर्मसंघाचे हिंदुधर्म हे सामुदायिक अभिधान आहे. - (१९४९ स.सा.वा. ३ : ७१३)
हिंदुधर्मान्तर्गत धर्मांची नावे
बहुसंख्य हिंदूंच्या धर्माला सनातन धर्म किंवा श्रुति-स्मृति-पुराणोक्त धर्म अथवा वैदिक धर्म ह्या प्राचीन व मान्य संज्ञांनी संबोधिता येते. इतर हिंदूंच्या धर्मांना त्यांच्या त्यांच्या मान्य नावांनी जसे शीख धर्म किंवा आर्यधर्म किंवा जैन धर्म किंवा बुध्द धर्म संबोधिता येईल. जेव्हा ह्या सर्व धर्मांना एकत्रित नाव देण्याची आवश्यकता येईल तेव्हा हिंदुधर्म असे व्यापक नाव देणे उचित होईल. ह्यामुळे अर्थहानी होणार नाहीच, परंतु तो अधिक अचूक व नि:संदिग्ध होईल व आपल्या लहान समाजातील संशय व मोठया समाजातील राग दूर करुन आपला समान वंश व समान संस्कृती दर्शविणार्‍या आपल्या प्राचीन ध्वजाखाली पुन्हा एकदा सर्व हिंदूंना एकत्र करील. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ६९ )
एक धर्मपुस्तक नाही हेच चांगले
कारण यामुळे आपला धर्मविकास थांबला नाही. आमचे धर्मतत्वही कोणत्या पुस्तकाच्या दोन पुठ्ठयात सामावू शकणार नाही. ह्या विश्वाच्या दोन पुठ्ठयांमध्ये जितके सत्य नि ज्ञान विस्तृत पसरलेले आहे तितके आमचे धर्मपुस्तक विस्तृत होईल. - (१९३७ हिं.स.प.पृ. ३७)
हिंदुधर्म क्लैब्याची गाथा नाही
हिंदुधर्म क्लैब्याची गाथा नाही. हिंदुधर्म नि:संशय सात्विक, क्षमाशील आहे. हिंदुधर्म क्रोधशीलही आहे. 'क्लैब्यं मा स्म गम: पार्थ' ही हिंदुधर्माची गर्जना आहे. 'अहिंसा परम धर्म:' ही ज्या हिंदुधर्माची व्याख्या आहे त्याच हिंदुधर्माची अगत्याची व तेजस्वी आज्ञा आहे की 'आततायिनमायान्तं हन्यादेवाविचारयन्' आणि त्या दोन्ही आज्ञांचा समन्वय, हिंदुधर्मच उत्तम प्रकारे लावू शकतो. - (१९२७ हिं.प., स.सा.वा. ३ : ४०)
ग्राह्यतम धर्म - हिंदुधर्म
काही झाले तरी बुध्दिवादाच्या दृष्टीनेही एकंदरीत पाहता धर्मांत ग्राह्यतम धर्म असेल तर तो हिंदुधर्म होय ! - (१९३५ स.सा.वा. ३ : ५७२)
माझे राष्ट्रीयत्वही मानवराष्ट्रात विलीन पावेल
जर मुसलमानत्व, ख्रिश्चनत्व इत्यादी 'त्वे' इतर सोडीत असतील तर माझे हिंदुत्वही मानुषकेत विलय पावेल. जसे माझे राष्ट्रीयत्वही - हिंदीपणही मानवराष्ट्रात तेव्हा विलय पावेल की जेव्हा इंग्लिशपण, जर्मनपण इत्यादीपणा लुप्त होऊन मनुष्यपणा तेवढा जगात मनुष्यमात्रात नांदू लागेल ! आज देखील जो खरा मनुष्यवादी (humanitarian) असेल त्याच्यापुरते त्याच्याशी देखील मी सर्व भेदभाव सोडून वागेन. - (१९२८ स.सा.वा. ३ : ६४४)
हिंदू शब्दाचा भविष्य काळातील संभाव्य अर्थ
एखाद्या भविष्यकाळी हिंदू हा शब्द केवळ हिंदुस्थानचा नागरिक वाचक होऊ शकेल. जेव्हा सर्व सांस्कृतिक व धार्मिक दुराग्रह आक्रमक गर्विष्ठपणाशी वचनबध्द असलेल्या शक्तीचे विसर्जन करतील व धर्म 'वाद' म्हणून न राहता ज्या समान पायावर मानवी राज्य ऐश्वर्याने व दृढपणे उभे राहील अशा पायाच्या मुळाशी असलेल्या चिरंतन तत्वांचा केवळ समान संचय म्हणून राहतील, तेव्हा हा दिवस उगवेल. भक्तिभावाने इच्छा करावी अशा ह्या सिध्दीची पहिली रेखासुध्दा क्षितिजावर दिसत नसताना कठोर वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणे मूर्खपणाचे ठरेल. जोपर्यंत धोकादायक युध्दघोषणांकडे झुकणार्‍या मतांचा त्याग इतर प्रत्येक वादाने केलेला नाही तोपर्यंत एकजीवता व सामर्थ्य निर्माण करणारी बंधने विशेषत: समान नाव व समान ध्वज ही बंधने शिथिल करणे कोणत्याही सांस्कृतिक वा राष्ट्रीय एकांकाला परवडणार नाही. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ५४)
हिंदुत्वाची परिणती
हिंदुस्थानाला पितृभूमी व पुण्यभूमी मानणारे, असा इतिहास असणारे व समान रक्त व संस्कृती ह्यांनी बांधलेले तीस कोटी लोक सर्व जगाला आपले म्हणणे अधिकारवाणीने सांगू शकतील. मनुष्यजातीस ह्या शक्तीस तोंड द्यावे लागेल असा एक दिवस उगवेल. ज्यावेळी हिंदू लोक जगाला काही सांगण्याच्या स्थितीत असतात तेव्हा त्यांचे सांगणे गीतेच्या वा बुध्दाच्या उपदेशाहून फार वेगळे असत नाही हेही तितकेच खरे आहे. हिंदू जेव्हा हिंदू राहत नाही तेव्हा तो अत्यंत उत्कटपणे हिंदू असतो व शंकराप्रमाणे सर्व पृथ्वी वाराणसी मानतो. वाराणसी मेदिनी ! मानतो किंवा तुकारामाप्रमाणे 'आमुचा स्वदेश ! भुवनत्रयामध्ये वास ! ' असे उद्गारतो. हे बंधूंनो ! विश्वाच्या मर्यादा - तेथे माझ्या देशाच्या सीमा आहेत ! - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ९०)

स्वातंत्र्य : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवडक विचार

‘स्वातंत्र्य’या विषयावरील सावरकरांचे निवडक विचार त्यांच्याच शब्दांत संदर्भासहित येथे दिलेले आहेत.
स्वातंत्र्यास्तव मरण - अमरत्वाचे साधन
मृत्यूचा पाश कोणाला तोडावयाचा आहे का? काळाइतकेच अमर्याद अमरत्व कोणास पाहिजे आहे काय? असेल तर एक उपाय म्हणजे स्वदेशस्वातंत्र्याच्या रणांगणात त्याने हरहर म्हणावा! कधीही मरण न येण्याचे एक साधन म्हणजे स्वदेशस्वातंत्र्यास्तव तत्काळ मरण हे होय! - (१९०८ लं.बा., स.सा.वा. ४ : ८६)
स्वातंत्र्याची खरी स्फूर्ती हृदयात उत्पन्न झाली की -
ती शक्यतेकडे पाहात नाही. ती स्फूर्ती उदय पावली की मनुष्यास स्वदेश स्वातंत्र्यार्थ स्वत: जे काय करता येईल ते करुन टाकण्याची भयंकर प्रेरणा करते. - (१९२७ श्रध्दा. २३ जून)
स्वातंत्र्ययुध्दाचे सातत्य कसे टिकते ?
जेव्हा जेव्हा राष्ट्र आपल्या स्वातंत्र्यार्थ उठते, जेव्हा जेव्हा स्वातंत्र्याचे बीज त्या राष्ट्राच्या पूर्वजांच्या रक्तात रुजते, जेव्हा जेव्हा ते बीज त्या राष्ट्राच्या हुतात्म्यांच्या रक्तात रुजते, आणि जेव्हा जेव्हा पूर्वजांवर झालेल्या अन्यायाचा सूड घेण्याकरिता एक तरी सुपुत्र त्या राष्ट्रात शिल्लक असतो तेव्हा तेव्हा अशा स्वातंत्र्ययुद्धाचा केव्हाही अंत होत नाही.
- (१९०७ पत्रक: करंदीकर शि.ल.: सावरकर चरित्र कथन १९४३ पृ. २०८-२१७)
वीरात्म्यांची योग्यता कशावरुन ठरते ?
... कोण मेला आणि कोण जगला ह्या रणघाईतील योगायोगावरुन हुतात्म्यांची नि वीरात्म्यांची योग्यता ठरत नाही. तर ती सद्समरात देहपतन होईतो किंवा विजय मिळेतो कोण लढत राहिला ह्यावरुन ठरते. -(१९५२ स.सा.वा. ८ : ४८३ )
स्वातंत्र्य हीच राष्ट्रीय देवता
... ते स्वदेशस्वातंत्र्य हेच आमचे ध्येय. ते स्वदेशस्वातंत्र्य हाच आमचा राजकीय धर्म, स्वदेशस्वातंत्र्य हीच आमची राष्ट्रीय देवता ,आमचा राजकीय देव, आमची ऐहिक उन्नती, आमचा मोक्ष. -(१९४९ मा.आ., स.सा.वा. १ : १८०)
आम्हास स्वतंत्रता का हवी होती ?
इंग्रजांसुध्दा अखिल मनुष्यमात्राचे कल्याण व्हाचे म्हणून, मानुषकाचा परम विकास व्हावा म्हणून आम्हांस स्वतंत्रता हवी होती. मनुष्याची आत्मिक उन्नतीच नव्हे, तर मानसिक उन्नती, नैतिक उन्नती आणि आत्मिक उन्नतीही राजकीय पारतंत्र्याने खुंटते म्हणून आम्हांस भारताची राजकीय स्वतंत्रता हवी होती. तीस कोटी मनुष्यांच्या माणुसकीचा विकास अवरुध्द करणारे भारताचे राजकीय पारतंत्र्य मनुष्य जातीच्याही अध:पतनास कारण होणार असल्यामुळे त्याचा उच्छेद, शिरच्छेद करणे हे आम्ही आमचे राजकीय कर्तव्यच नव्हे तर धार्मिक कर्तव्यही समजत होतो. - (१९४९ मा.आ., स.सा.वा. १ : २४९)
उभ्या भारताची मुक्तता
ब्रिटिश भारत, पोर्तुगीज भारत, फ्रेंच भारत - इत्यादी शब्द ऐकताच आमची मान लाजेने खाली गेली पाहिजे. नेपाळपासून सिंहलापर्यंत, सिंधूपासून सिंधूपर्यंत हे भारत एक अखंड अविभिन्न आणि अविभाज्य आहे ! त्या उभ्या भारताची आम्ही मुक्तता करु इच्छितो. - (१९२८ श्रध्दा. १ मार्च )
राजकीय स्वातंत्र्यावाचून राष्ट्रीय जीवन असंभव
राजकीय स्वातंत्र्यावाचून राष्ट्रीय जीवनाच्या ह्या कोणत्याही घटकांचे (स्वभाषा, साहित्य, इतिहास, व्यापार इ.) अस्तित्वही शक्य नाही, मग परिपोष कुठला ?
- (१९४९ मा.आ., स.सा.वा १ : १८०, १८१ )
भारत भूमीवर दुसर्‍यांचा नांगर फिरला की -
परमेश्वराने तुला भारतभूमीसारखी शेती दिली आहे. त्या विस्तीर्ण शेतीला गंगा, यमुना,गोदावरी, कावेरी, सिंधू व ब्रह्मपुत्रा हे अखंड कालवे देवाने तयार करुन ठेवले आहेत. ह्या दिव्य शेतीत ह्या अखंड कालव्यांच्या सहाय्याने तुझ्या पूर्वजांनी धान्यच नव्हे तर प्रत्यक्ष सोने पिकविले आहे ! परंतु देवाने ह्या शेतीच्या करारात एक शर्त घातली आहे. ती ही की, ही शेती तूच नांगरली पाहिजेस. तूच ही शेती करशील तर हीत सोने पिकेल. परंतु दुसर्‍याचा नांगर हिच्यावर फिरला की हीत प्लेग पिकेल, दुष्काळ पिकेल, पारतंत्र्य पिकेल ! मग हा नांगर बाल्फर २ चा असो की मोर्ले ३ चा असो. ही देवाची शर्त तू पाळलीस तर हिंदुस्थाना पुढच्या हंगामात तुझ्या ह्या दिव्य शेतीत पाऊस पडो किंवा न पडो कोहिनूर पिकतील, मयुरासने पिकतील, शिवाजी पिकतील ! -(१९०६ लं.बा., स.सा.वा. ४ : ५२)
सर्व कर्तव्ये पार पाडण्यासाठी स्वदेशस्वातंत्र्य आवश्यक
राजकारणातील अगदी प्रथम आधारभूत कर्तव्य म्हटले म्हणजे स्वदेश स्वातंत्र्य हे होय. मनुष्यजाती, स्वदेश, कुटुंब, व्यक्ती अशा पायरीने मनुष्याची कर्तव्यतारतम्यता आहे. या परंपरेच्या वाटयाला जी राजकीय कर्तव्ये आली आहेत त्यामध्ये स्वदेशस्वातंत्र्य हे प्रधानकर्तव्य आहेच आहे. परंतु राजकीय कर्तव्यासाठी केवळ नव्हे, तर इतर सर्व कर्तव्ये मनुष्याकडून यथास्थित रीतीने पार पाडण्यास स्वदेशस्वातंत्र्य आधी मिळविले पाहिजे. व्यक्तीची किंवा कुटुंबाची कर्तव्ये जर त्यांचा स्वदेश पारतंत्र्यात असेल तर कधीही यथास्थित चालावयाची नाहीत. - (१९०६ मॅ.प्र., स.सा.वा. ८ : ७)
स्वधर्म व स्वराज्य
स्वधर्माशिवाय स्वराज्य तुच्छ होय व स्वराज्याशिवाय स्वधर्म बलहीन होय. स्वराज्य ही ऐहिक सामर्थ्याची तरवार स्वधर्म ह्या पारलौकिक साध्यासाठी सदोदित उपसलेली असावी... - (१९०७ स.स्वा., स.सा.वा. ८ : ३३)
खरा धर्म मानव धर्म
इंग्लिशांचा इंग्लिश म्हणून आम्ही केव्हाही द्वेष केला नाही, करु दिला नाही. इंग्लंड हिंदुस्थानवर आततायी आक्रमण जोवर करीत आहे, तोवरच आमचे शत्रू. तो आततायीपणा त्यांनी सोडताच ते आमचे मित्रच आहेत. कारण मनुष्यमात्र एक आहे, आपला बंधू आहे. इतकेच नव्हे , तर इंग्लंडच्या न्याय्य स्वातंत्र्यास जर कोणी दुसरे आततायी राष्ट्र अन्यायी दंडेलीने तुडवू पाहील तर आम्ही इंग्लंडच्या मुक्ततेस्तव असेच झटू, झुंजू ही आमची अनेक वेळा व्यक्तविलेली प्रतिज्ञा असे. आमची खरी जात मनुष्य, खरा धर्म माणुसकी, मानवधर्म, खरा देश पृथ्वी, खरा राजा ईश्वर अशी आमची अत्युदार भावना असे. - (१९४९ मा.आ., स.सा.वा. १ : २४८)
राष्ट्रीय पक्ष, नेमस्त पक्ष व क्रांतिकारक पक्ष
... हा निर्बंध (कायदा) वाईट आहे तो बदला, हा कर जाचक आहे, तो काढा अशी किरकोळ रडवी गार्‍हाणी किती दिवस करावयाची ! त्याच्या मुळावरच घाव घातल्यावाचून तो वृक्ष नष्ट होणार नाही. मग जर केव्हा तरी तो घाव घालावाच लागणार, तर त्यास आरंभ आजच का करु नये? जो कोणी आरंभ करील त्यास आपल्या प्राणांचे मूल्य द्यावेच लागणार, मग तो आरंभ आणखी शंभर वर्षांनी करा ना का ! तेव्हा तो प्रारंभ आजच करुन आपणच ते प्राणदानाचे मूल्य का देऊ नये ? या विषारी वृक्षाची पाने तेवढी वाईट आहेत ती खुडली पाहिजेत, मुळाशी आमचा वाद नाही हे म्हणण्यात 'राष्ट्रीय' पक्षाची चूक आणि त्या वृक्षाला जर आपण न दुखविता नुसत्या प्रार्थनांचे ओशट दूध घालीत राहिलो तर तो आपण होऊन अमृत वृक्षात रुपान्तरित होईल हे म्हणणार्‍या 'नेमस्तांची' चूक. ह्या दोन्ही चुका सारख्याच बुध्दिभ्रष्ट होतात. त्या दोन्हीही सुधारल्या पाहिजेत. त्यांस ते शक्य वाटत नसेल तर आपण ते शक्य करु या. कारण परवशतेचा विषारी वृक्ष सुधारण्याचा एकच मार्ग आहे नि तो म्हणजे त्याचे आमूलाग्र उन्मूलन. त्या वृक्षाच्या मुळाशीच आमचे खरे भांडण आहे. इंग्रजांचा इकडे येणारा अधिकारी वर्गच नव्हे तर इंग्रजी सत्ताच उलथून पाडली पाहिजे आणि ही गोष्ट स्पष्टपणे, ज्वालाग्राही भाषेत, बंदीगृहाच्या छपरावरुन नि फाशीच्या खांबावरुन गर्जत राहिल्यावाचून लोकांची हीन आणि क्लीब उपेक्षावृत्ती मावळून ते केव्हाही उठावयाचे नाहीत. कोणत्या तरी अत्युच्च, अतिभव्य, अतिदिव्य ध्येयास त्या भोवती त्यागाची आणि पराक्रमाची जाज्वल्य प्रभावळ पेटवून ती लोकांच्या दृष्टीसमोर धरल्यावाचून लोकांची मने आकर्षित होणार नाहीत. वैयक्तिक संसाराच्या चाकोरीतून ते तसल्या कोण्या बेभान, दिव्य ऊर्मीवाचून बाहेर येणार नाहीत. महान ध्येयाच्या प्रेमाने उन्मत्त झाल्यावाचून ते उसळून उठावयाचे नाहीत. - (१९४९ मा.आ., स.सा.वा १ : १७९, १८०)
लो. टिळकांचे आम्ही खरे निष्ठावंत अनुयायी
ते जे मनात बोलत, ते आम्ही गर्जलो. ते जेथे थांबत तेथून आम्ही पुढे सरु. ते नेते, ते राष्ट्राच्या एक पाऊल पुढे असत. पण त्यांना त्या पुढची पावले निर्विघ्नपणे टाकता यावी म्हणून आम्ही त्यांच्याही पुढे शंभर पावले जाऊन झुंजून आमच्या राष्ट्राच्या सशस्त्र दळभाराचा मार्ग निष्कंटक करण्याचे (सॅपर्स ऍण्ड मायनर्सचे) पुर:सर पथकाचे यत्न केले. जिथे त्यांची साधने बोथट होती तिथे अचानक त्याच साधनांच्या लोखंडास वितळवून आम्ही साधनांचे शस्त्र बनविले, बोथटपणास धार पाजली, म्हणूनच आम्ही त्यांचे खरे निष्ठावंत अनुयायी. कारण त्यांच्यापुढे धावून त्यांचे मनोगत, उद्दिष्ट सिध्दीस नेण्यास झटलो. ते खड्गाची मूठ होते. आम्ही क्रांतिकारक त्याचे पाते होतो. खड्गाची मूठ ही जरी पाते होऊ शकत नाही तरी पाते हे मुठीच्याच आधारावर रणकंदनी लवलवते, पाते मुठीच्याच मनोगताचे पारणे फेडीत असते. - (१९४९ मा.आ., स.सा.वा. १ : १४९)
इंग्रज फारसे विसरले नाहीत, आम्ही फारसे शिकलो नाही
खरोखर गेल्या दीडशे वर्षात इंग्रजांच्या राजकर्तृत्वाच्या चिकाटीत आणि सैनिक धैर्यात जसा फारसा फरक पडला नाही. तसाच त्यांच्या त्या गुणांची पारख करुन त्या मानाने त्या विपक्षाची तोंड देण्याची सिध्दता कशी करावी हे न समजणार्‍या आमच्या वेडगळ भाबडेपणातही काही फारसा फरक झाला नाही. - (१९२७ मा.ज., स.सा.वा. १:५३८)
ज्यात स्वत्व राहील ते स्वराज्य
जर ह्या स्वराज्यात प्रत्येक धर्मपंथाचे स्वत्व राखिले जाणार आहे, तर मग त्यात हिंदुधर्माचेही स्वत्व योग्य प्रमाणाने आणि यथान्याय राखिले पाहिजे, नाही काय ? इतकेच नव्हे तर हिंदुस्थानातील लोकसंख्येच्या दोन तृतीयांश भाग ज्या हिंदूंचा आहे, त्यांचे स्वत्व ज्या स्वराज्यात इतर अत्यल्प किंवा अल्प अशा अहिंदू समाजांच्या स्वत्वाच्या अतिरेकी मागण्यांस बळी दिले जाते, ते स्वराज्य नव्हे. - (१९२७ हिं.पं., स.सा.वा. ३ : ५०)
एक धनी जाऊन दुसरा यावा अशी हिंदूंची इच्छा नाही. हिंदुस्थानच्या सीमेत जन्मला म्हणून एडवर्डचे जागी औरंगजेब आणावा येवढयासाठी लढा, युध्द करुन प्राण देण्यास हिंदू सिध्द झालेले नाहीत. यापुढे स्वत:च्या भूमीवर, स्वत:च्या घरात, स्वत:च स्वामी व्हावे अशी हिंदूंची इच्छा आहे. - (१९३० हिं.रा.द., स.सा.वा. ६ : ३५४)
शब्दांनी मनुष्य कसा फसतो याचे उत्तम उदाहरण गांधीजींच्या शब्दात सापडते. ते म्हणतात, ''मी जिनांचे राज्यात सुखाने राहीन, कारण त्यांचे राज्य झाले तरी हे हिंदी राज्य आहे.'' हिंदी या शब्दाने कशी फसगत होते याचे उत्कृष्ठ उदाहरण आहे. येथे राज्य केलेले औरंगजेब वगैरे हिंदीच होते, मग त्यांच्याविरुध्द शिवाजी महाराजांना का उठावे लागेल ? .... हिंदुस्थानात राहणारे म्हणजे हिंदी तर येथले साप, विंचू, वाघ हेही सर्व हिंदीच होतील; पण आपण त्यांना तसे मानतो का ? - (१९४० स.सा.वा. ४ : ४९३)
स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास विकृत करु नका
समान ध्येयाकरिता इतर पक्षांतील देशभक्तांची सेवा मान्य करण्यास क्रांतिकारक नेहमीच सिध्द आहेत. परंतु त्यांच्या तथाकथित अहिंसक, तुरुंगभरतीच्या व स्वत:चा घात करुन घेणार्‍या कार्यक्रमामुळेच केवळ ब्रिटनने गुडघे टेकले व इतिहासात अभूतपूर्व शांततामय व रक्तहीन क्रांती झाली ह्या एका गटाच्या क्षुद्र व दिशाभूल करणार्‍या ढोंगाचे खंडण करणे क्रांतिकारकांचे कर्तव्य आहे. ह्या ढोंगातील प्रत्येक शब्द बुध्दिपूर्वक असत्य आहे. ह्या असत्यास आव्हान दिले नाही तर राष्ट्रात आत्मघातकी मूर्खपणा पोसला जाईल. हिंदी क्रांतिकारक चळवळीचा, उदाहरणार्थ सन १९०१ ते १९४७ पर्यंतचा विश्वसनीय इतिहास, जोपर्यंत त्या पिढीतील ज्यांनी चळवळ केली ती पिढी निघून गेली नाही , तोपर्यंत लिहिणे शक्य झाले तर हे साध्य करता येईल. - (१९४७ हि.स्टे., पृ. २०९)
इतिहासरक्षणाचे श्रेय काही अंशी शत्रुपक्षाला
सशस्त्र क्रांतिकारकांविषयी उल्लेख करण्यासही आमचे बहुतेक स्वदेशी ग्रंथकार थरकापत होते आणि स्वत:स 'अहिंसक' पक्षीय म्हणविणारे तर त्या क्रांतिकारक वीरात्म्यांचे नि हुतात्म्यांचे नामोल्लेखही करणे 'पाप' समजत असत नि अद्यापही समजतात. त्यामुळे क्रांतिकारक आंदोलनाचा काही तरी साधार इतिहास जो आज जिवंत राहू शकला आहे तो तितका तरी जिवंत ठेवण्याचे श्रेय रौलट रिपोर्टसारखी राज्यीय प्रतिवृत्ते ज्या ब्रिटिश प्रसिध्दीविभागाने छापली त्या आमच्या परकीय शत्रुपक्षालाच दिले पाहिजे. - (१९५२ स.सा.वा. ८ : ४६५)
ब्रिटिश गुप्तचरांची प्रतिवृत्ते सर्वस्वी विश्वसनीय नाहीत
... ब्रिटिशांच्या हिंदुस्थानातील काय किंवा इंग्लंडातील काय, शासनीय गुप्तचर विभागाची अधिकृत म्हणविणारी जी प्रतिवृत्ते आज प्रसिध्द झालेली आहेत किंवा जी प्रतिवृत्ते त्यांच्या लेखालयांत (रेकॉर्डमध्ये) पडलेली आहेत त्यांत मी वर दाखविल्याप्रमाणे अनेक प्रकरणी नि अनेक प्रमाणे भारतीय क्रान्तिकारकांच्या गुप्त चळवळींविषयी आणि रणकृत्यांविषयी चुकीची माहिती भरलेली असल्यामुळे त्या ब्रिटिश शासनीय प्रतिवृत्ताच्या आधारावर काय तो आमच्या ब्रिटिशभारतीय स्वातंत्र्ययुध्दाचा इतिहास लिहिला जाऊ नये. नाहीतर त्यांच्यातील चुकीची माहितीही सत्य घटना म्हणून इतिहासातही नित्याचे घर करुन बसतील.
- (१९६५ श.शि.पृ. १५७)
सत्तान्तराच्या वेळी इंग्रजांनी वाटाघाटी कोणाशी केल्या ?
इंग्रजांनी त्यातल्या त्यात ज्या ज्या हिंदी पक्षांचे राजकीय धोरण प्रथमपासून तत्वत: भ्रांत, स्वभावत: भेकड, साधारणत: ब्रिटिशधर्जिणे, मुसलमानांपुढे चळचळ कापणारे आणि कशीतरी नि हाती येईल तितकीच राजसत्ता का होईना पण आपल्या पक्षाच्या पदरात पाडून घेण्यास आतुर झालेले आढळले, त्या पक्षांनाच हिंदुस्थानचे पुढारी म्हणून ब्रिटिशांनी मान्यता दिली आणि राजकीय सत्तान्तराविषयीची बोलणी सारी त्यांच्याशीच काय ती केली ! अर्थात हे पक्षही देशभक्तच होते. वैध नि नि:शस्त्र मार्गांनी का होईना पण त्यांनीही कष्ट केले होते. -(१९६३ स.सो.पा., स.सा.वा. ४ : ९६४)
स्वातंत्र्यप्राप्ती रक्तशून्य नाही
ही क्रांती रक्तशून्य नाही. १८५७ पासून तो १९४७ पर्यंत जे आपले लक्षावधी लोक सशस्त्र युध्दात मेले आणि आपण दुसर्‍यांचे मारले त्यांचे ते रक्त काय रक्त नव्हते ? विशेषत: ५७ पासून ते ९७ च्या काळात तर सबंध देशातील फाशीचे स्तंभ हे सतत रक्ताने ओले असत- असे असता ही क्रांती रक्तशून्य आहे हे म्हणणे धादांत खोटे आहे. एवढे मात्र खरे की जे रक्तशून्य क्रांती झाली असे म्हणतात त्यांचे कपडे शुभ्र आहेत ! - (१९५२ सा.हिं. २२ डिसेंबर)
स्वातंत्र्यार्थ प्राणांची पर्वा न करता यांनी त्याग केला म्हणूनच नि:शस्त्र प्रतिकारक सभासंमेलनाद्वारे प्रचार तरी करु शक ले. - (१९५२ सा.हिं. २२ डिसेंबर)
...त्यांच्या मते राष्ट्राचा इतिहास १९२० नंतर सुरु झाला ! मुलास आपल्या जन्मापासूनच जग सुरु झाले असे वाटत असेल तर वाटो; पण बापही माझ्यासमोर जन्मला असेच तो म्हणेल काय ? पट्टाभि सीतारामय्यांना७ हा इतिहास माहीत नाही, म्हणून तो घडलाच नाही असे का म्हणावयाचे आहे ? हेच का 'सत्य'? - (१९३९ स.सा.वा. ४ : ४०७)
स्वातंत्र्यसंपादानाचे श्रेय सामायिक
ब्रिटिशांच्या परदास्यातून भारताची मुक्तता करण्याचे नि स्वतंत्र नि सार्वभौम असे आपल्या भारताचे संघराज्य करण्याचे श्रेय हे सशस्त्र किंवा नि:शस्त्र अशा कोणत्याही पक्षाचे नसून ते गेल्या दोन पिढयांतील सर्व पक्षांच्या सर्व स्वदेशनिष्ठांचे सामायिक श्रेय आहे. १८५७ च्या सशस्त्र क्रांतिकारकांचा वाटा तर त्यात आहेच आहे. पण त्यानंतरच्या देशभक्त दादाभाईंपासून देशभक्त गोखल्यांपर्यंतच्या नेमस्त म्हणविणार्‍या पक्षांतील सर्व कार्यकर्त्यांना ते श्रेय यथाप्रमाण मिळाले पाहिजे.
राष्ट्रीय किंवा जहाल म्हणून ज्या पक्षाला म्हणत त्यांचाही वाटा ह्या सामुदायिक श्रेयात आहेच आहे. स्वत:स असहकारवादी आणि अहिंसक म्हणवून घेणार्‍या सहस्त्रावधी देशभक्तांनी नि देशसेवकांनी ह्या राष्ट्रीय स्वातंत्र्यास्तव जे भारतव्यापी कार्य केले, त्याविषयीही आम्ही सर्वांनी कृतज्ञता व्यक्तविलीच पाहिजे. मी तर त्याच्याही पुढे जाऊन स्वानुभवाने असे सांगतो की सशस्त्र वा नि:शस्त्र अशा कोणत्याही गुप्त वा प्रकट चळवळीत सक्रिय भाग ज्यांनी घेतला नाही परंतु ज्यांनी ज्यांनी आपापल्या हृद्यात एक सहानुभूती बाळगली आणि 'देवा, माझ्या भारताला स्वतंत्र कर' म्हणून अबोल प्रार्थना केल्या, अशा आमच्या लक्षावधी स्वदेशबांधवांच्या मूक शुभाशीर्वादांनाही आजच्या आपल्या ह्या राष्ट्रीय विजयाचे श्रेय त्या त्या प्रमाणात आहेच आहे. - (१९५२ क्रां. घो. पृ. ७१)
शुध्द सुखाची परमसीमा कोणती ?
जर जगात काही निर्मल सुखाचे क्षण असतील तर त्यांच्यात तो क्षण शुध्द सुखाची परमसीमा करणारा होय की, ज्या क्षणी आपल्या अत्यंत प्रिय देश जननीला ज्याने असह्य दु:ख दिले तो शत्रू मार खात देशाच्या हद्दीबाहेर पळून चालेला आहे हे पाहता येते. जर निर्भेळ धन्यतेचा एखादा दिवस असेल तर तो तोच होय की ज्या दिवशी देशजननीला पूर्ण स्वातंत्र्य मिळवून रणांगणातून देशभक्त परत येत आहेत व त्या स्वातंत्र्यासाठी पतन पावलेल्या देशवीरांच्या आत्म्यांना संबोधून अशी गर्जना करीत आहेत की,''देशवीरहो, आपला देश स्वतंत्र झाला आहे !तुमच्या रक्ताचा सूड उगविला आहे.'' - (१९०६ मॅ.प्र., स.सा.वा. ८ : १९)

क्रांती : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवडक विचार

'क्रांती' या विषयावरील सावरकरांचे निवडक विचार त्यांच्याच शब्दांत संदर्भासहित येथे दिलेले आहेत.

क्रांती - एक प्रयोग
प्रत्येक क्रांती हा एक प्रयोग असतो. - (१९३६ क्ष.कि. स.सा.वा. ३ : २०६ )
क्रांती व उत्क्रांती ह्यांचा परस्परसंबंध
विश्वनियमानुसार क्रांती व उत्क्रांती यांचे प्रवाह अखंड व सतत वाहत असतात. कालाच्या उतरणीवरुन अकल्पनीय जोराने आपटत कोसळणार्‍या प्रपातांना क्रांती म्हणतात व समप्रदेशावर वाहत जाणार्‍या नदीप्रमाणे विश्ववृत्तीचे जे प्रगमनात्मक मंदौघ त्यांना उत्क्रांती म्हणतात. क्रांती व उत्क्रांती ही एकमेकांची कार्ये व कारणे होत. क्रांतीतून उत्क्रांती व उत्क्रांतीतून क्रांती उत्पन्न होणे हे उत्क्रांती - क्रांतिचक्र कालचक्राच्या आरंभापासून गतिमान झालेले आहे. - (१९०६ लं.बा., स.सा.वा. ४ : ४९)
क्रांतीच्या उगमाचा शोध घ्या
..ऐतिहासिक क्रांतीच्या इतिहासलेखकाने त्या क्रांतीतील वरवर असंबध्द दिसणार्‍या प्रसंगांना किंवा तिच्या अद्भुततेला पाहून तिथेच स्तिमित होऊन न बसता तिच्या उगमाकडे शोध करीत गेले पाहिजे. इतकेच नव्हे तर , त्या शोधात भलत्याच व आकस्मिक निघालेल्या फाटयांस सोडून अगदी मूलतत्वांपर्यंत शोध लावला पाहिजे, व मग त्या तत्वाची दुर्बिण घेऊन त्या क्रांतीच्या विस्तीर्ण प्रदेशाचे निरीक्षण केले पाहिजे. अशा रीतीने आरंभ केल्यास अनेक असंबध्द प्रसंगात पूर्ण संबध्दता दिसू लागते, वक्ररेषा सरळ भासू लागतात व सरळ रेषा वक्र भासू लागतात... - (१९०७ स.स्वा.,स.सा.वा. ८ : २७)
वर्णनापेक्षा विवरण महत्वाचे
... मूल शक्तीच्या विवरणाशिवाय त्या क्रांतीचे खरे रहस्य कधीही लक्षात येणारे नसल्याने इतिहासशास्त्रात नुसत्या वर्णनापेक्षा मूलविवरणालाच अधिक महत्व दिलेले आहे. - (१९०७ स.स्वा., स.सा.वा. ८ : २६)
स्वातंत्र्येतिहासाची पारायणे करा
... रामकथेची किंवा कृष्णकथेची जशी पारायणे आपण करतो तशीच स्वातंत्र्य लक्ष्मीच्या इतिहासपुराणांचीही पारायणे आम्ही केली पाहिजेत. जशी धार्मिक संध्या प्रत्यही केली पाहिजे तशीच ही संध्या - राष्ट्रीय संध्या. - (१९४९ मा.आ., स.सा.वा. १: १९४)
पराक्रमाबरोबर दिव्य ध्येय व युध्दकौशल्यही हवे
एकटा पराक्रम काही मृत राष्ट्र जिवंत करु शकत नाही; काही स्वातंत्र्य मिळवीत नाही, तर त्या पराक्रमास कोणत्या दिव्य ध्येयाचे आणि युध्दकौशल्याचेही साहाय्य हवे असते. - (१९२७ र.शिं., स.सा.वा. २ : ३७५)
राष्ट्रीय सैन्याचे मुख्य ध्येय विजय
... राष्ट्रीय सैन्याचे मुख्य ध्येय विजय हे आहे. आपल्या न्याय्य पक्षाची एकंदरीत कमीत कमी हानी होऊन अन्याय्य विपक्षाची एकंदरीत जास्तीत जास्त हानी करण्यास जी युध्दकला झटते ती खरी युध्दकला होय ! त्या युध्दकलेला हुतात्मता हाही केव्हा केव्हा एक अत्यंत अवश्य आणि अत्यंत वंद्य असा घटक होऊ शकतो. पण तो अपवाद म्हणून. केवळ हौंतात्म्य ही काही विजयाची निश्चित हमी नव्हे ! - (१९२९ ते.ता., स.सा.वा. २ : ४९४)
अनावश्यक प्राणदान अनुकरणीय नव्हे
... ध्येयार्थ अत्यवश्य असलेले प्राणदानच तेवढे सूक्त आहे. पण ध्येयार्थ अनावश्यक असलेले प्राणदान त्या वीरात्म्यांच्या देशभक्तीचे किंवा निग्रहाचे किंवा नि:स्वार्थ निर्भयतेचे द्योतक होणारे आणि म्हणूनच हेतुत: वंदनीय असणारे परंतु व्यवहारत: ध्येयाच्या अंतिम विजयास अनावश्यक नव्हे तर एका अर्थी अपायकारक होणारे आणि म्हणूनच अनुकरणीय नसणारे आहे... - (१९२९ ते.ता., स.सा.वा. २ : ४९५)
यशस्वी क्रांतीचा वणवा प्रतिशोध घेणार्‍या हौतात्म्याच्या चितेतून
... मरण ? आमच्या मातृभूमीच्या सिंहासनावर ह्या तिच्या शत्रूने चढून बसावे नि आम्ही ते जिवंत राहून पाहावे हेच आम्हांस मरणाहून असह्य वाटते. शक्य असो नसो, यश येवो वा अपयश, आम्ही आमच्यापुरता तरी ह्या देशशत्रूचा सूड उगविणार ! अशा सुडापायी जे मरण येईल त्याचेच आम्हांस ह्या पौरुषशून्य जीवनाहून अधिक आकर्षण वाटत आहे. कारण यशस्वी राज्यक्रांतीचा वणवा जेव्हा केव्हा भडकतो तेव्हा तो अशाच प्रतिशोध घेणार्‍या हौतात्म्याच्या जळत्या चितेतील आगीनेच भडकतो. आम्ही आमचे कर्तव्य करणार - मग इतर कोणी मागे येवो वा न येवो ! - (१९४९ पू.पी., स.सा.वा. १ : ३१ )
कामी आलेल्या सैनिकांची कृतज्ञ आठवण
रणात कामास आलेल्या सैनिकांची कृतज्ञपणे आठवण काढणे हे नवीन सैनिकांची भरती करण्याचे अत्यंत परिणामकारक साधन असते. -(१९२७ मा.ज., स.सा.वा. १ :५७५)
आहुती लहान व मोठी
कधी होमाच्या विस्तीर्ण स्थंडिलात तर कधी वैश्वदेवाच्या वितीएवढया कुंडात पण अग्नीची आहुती टळली नाही, म्हणून तर अग्नि जिवंत राहिला. - (१९२७ मा.ज., स.सा.वा. १ : ३८४)
संघटनेत शांतता परंतु क्रांतीत धाडस
क्रांत्या ह्या गणितातल्या बेरीज - वजाबाकीने चालत नसतात, तर हृदयातील अवसानाच्या अतर्क्य बलाने विजय पावतात. मंदतेच्या थंडपणाने त्या थंड पडतात - गतीच्या उष्णतेने त्या उष्ण राहतात. संघटना चालली असता शांतता असावी, गणित करावे, थंडपणाने कालनिश्चितता ठरवावी. परंतु एकदा शीळ फुंकली गेली की मग जीव जावो अथवा राहो अशा मारामारीने भयंकर गर्दी उडवून द्यावी. तिथे जो धरसोड करील त्याचा जीव गेलाच. तिथे उठू का नको म्हणून जो म्हणेल तो कायमचा खाली कोसळलाच. - (१९०९ स.स्वा., स.सा.वा. ८ : ३९०)
अराजकतेत क्रांतीचा नाश
ज्याचे राज्य उलथून टाकावयाचे असेल त्याच्या कायद्यांना तरवारीने चिरुन टाकणे म्हणजे राज्यक्रांती होय ! परंतु एकदा परक्यांच्या कायद्याला तरवारीने चिरण्याची सवय लागली की मग त्या धुंदीमध्ये त्या सवयीचे पर्यवसान वाटेल त्या कायद्याला स्वत:च्या लहरीप्रमाणे तुडविण्याची खोड लागू शकते. दुष्ट कायद्याचा नाश करण्याचे कामी चटावलेली तरवार कायद्याचाच नाश करु शकते. परक्यांच्या अंमलाचा नि:पात करु निघालेले वीर शेवटी अंमलाचाच नि:पात करु लागतात ... अराजकता ही परराज्याइतकीच व बंधनरहितता दुष्ट बंधनाइतकीच व्यक्तीच्या, समाजाच्या व राष्ट्राच्या नाशाला कारणीभूत होणारी आहे. ह्या समाजसत्याचे विस्मरण ज्या ज्या क्रांतीत घडू लागले त्या त्या क्रांतीचा तिच्या क्रांतित्वामुळेच विनाश झालेला आहे. -(१९०९ स.स्वा., स.सा.वा. ८ :२८६,२८७)
राज्यक्रांतीवर अढळ आसन हवे
राज्यक्रांती हा एक विचित्र पक्षी आहे. तो फार दिवसांनी पिंजर्‍यातून बाहेर पडला की इष्टस्थळी जाण्याचे आधी आकाशात इतस्तत: खूप भरार्‍या मारु लागतो. ज्याला त्या गरुडासारख्या पक्ष्यावर बसून इच्छित स्थळी जाणे असेल त्याने त्याचे पाठीवर अढळ आसन ठेवले पाहिजे. भरार्‍या मारुन मारुन एकदा त्याच्या पंखांची रग जिरली की मग त्याचे पाठीवर अजूनपर्यंत जर कोणी अढळ राहिलेला असेल तर त्याच्या पूर्ण लगामी तो येऊ लागतो. - (१९०९ स.स्वा., स.सा.वा. ८ : १३३)
क्रांतिकारक युध्द केव्हा विराम पावते ?
क्रांतिकारक युध्दाला स्वातंत्र्य वा मृत्यू ह्यांवाचून दुसरा युध्दविराम माहीत नसतो. - (१९०५ स.सा.वा. ५ : ४४४)
क्रांतीची उठावणी व प्रसार ह्यांत फार अंतर नसावे
मंदपणासारखे क्रांतीला प्राणहरण करणारे दुसरे विष नाही. क्रांतीचा विस्तार जितका त्वरित व जितका आकस्मिक होईल तितका तिच्या जयाचा संभव जास्त वाटत असतो. ही विस्ताराची त्वरा शिथिल झाली म्हणजे शत्रूला संरक्षणाची संधी मिळते. जे आधी उठतात त्यांचा आपल्याबरोबर कोणी येत नाही म्हणून उत्साह घटू लागतो व जे मागून येणार त्यांच्या मार्गात मधल्या संधीचा फायदा घेणारा चाणाक्ष शत्रू अनेक विघ्ने रचून ठेवतो. म्हणून उठावणी व प्रसार यांच्यामध्ये फार वेळ जाऊ देणे हे क्रांतियुध्दला सदोदित अपायकारक होते. - (१९०९ स.स्वा., स.सा.वा. ८ : १०७)
गुप्त मंडळयांचे उपयोग
... गुप्त सभा भरवून त्यांत स्वातंत्र्याचे शिक्षण स्पष्ट व उत्तम रीतीने देता येते. ते लोकांस ताबडतोब कळते व परकीय सरकारास दाबणे अशक्य होते ... दुसरा फायदा असा की, फार थोडया शक्तीने गुप्त मंडळयांना परकीय सरकारास गांगरुन सोडता येते .... तिसरा फायदा म्हणजे लढाईची तयारी करता येते. - (१९०६ मॅ.प्र., स.सा.वा. ८ : ११, १२)
... स्वदेशात गुप्त रीतीने हत्याने तयार करण्याचे अगदी लहान परंतु पुष्कळ व अंतराअंतरावर असे गुप्त कारखाने काढावे.
... गुप्त मंडळयांनी इतर देशांत हत्यारे खरेदी करुन ती मालाच्या जहाजांतून लपवून धाडावी. - (१९०६ मॅ.प्र., स.सा.वा. ८ : १७)
शासकीय सेवा व राष्ट्रीय प्रवृत्तीचे युवक
शासकीय सेवेत राष्ट्रीय प्रवृत्तीच्या युवकांनी घुसलेच पाहिजे आणि तेथे राहूनही शक्य ते ते राष्ट्रीय कार्य केलेच पाहिजे. - (१९३८ हिं.स.प.पृ. १३८)
स्वदेशी चळवळ व राज्यक्रांती
इतिहासात स्वदेशी चळवळीचे पर्यवसान राज्यक्रांतीत व स्वातंत्र्यप्राप्तीत झाल्याची ही उदाहरणे काही आकस्मिक रीतीने घडून आलेली नाहीत. ते काही अपघात नाहीत. - (१९०६ मॅ.प्र., स.सा.वा. ८ : ९)
सैन्याला स्वदेशाकडे वळविणे
परकीय सरकाराला तद्देशीय सैन्य ठेवल्यावाचून कोणत्याही देशावर राज्य करता येणे शक्य नसते. अशा स्थितीत लष्करी शिपायांना जर स्वदेशाकडे वळविता आले तर त्याचा दुहेरी फायदा होतो. एक तर परक्यांचा विश्वास उडून जातो व आयत्या वेळी ते घाबरे होतात; व दुसरे असे की राष्ट्रपक्षास आयते शिकलेले व सशस्त्र लोक मिळू शकतात. -(१९०६ मॅ.प्र., स.सा.वा. ८ : १७)
गनिमी कावा
परक्यांना गनिमी काव्याचा केव्हाही आश्रय करता येत नाही... परतंत्र देशांना गनिमी युध्द फारच फायदेशीर असते. - (१९०६ मॅ.प्र., स.सा.वा. ८ : १८)
... फायदेशीर नसल्यास लढाई टाळावी. फायदेशीर असल्यास लढाई द्यावी. परंतु केव्हाही रणामध्ये भित्रेपणाने वा बेशिस्तीने बदलौकिक करुन घेऊ नये. शौर्याने अशी झुंज देत रहावी की रणात अपयश आले तरी जगात सत्कीर्तीच वाढली पाहिजे, म्हणजे शत्रूला धाक बसतो. स्वसैन्यात अनीती वाढत नाही, शिस्त सुटत नाही, उत्साह वाढू लागतो, शौर्याचा उत्कर्ष होतो, विजय हटकून मिळतो. शत्रूने आपल्याला शौर्याने जिंकले असे कधीही होऊ देऊ नये ही गनिमी काव्याची किल्ली आहे. -(१९०९ स.स्वा., स.सा.वा. ८ : ३५०)
परकीय साम्राज्यावरील संकट ती परतंत्र राष्ट्राची संधी
कोणतेही राष्ट्र जेव्हा एखाद्या परकीय बलाढय साम्राज्याच्या पारंतत्र्याच्या शृंखलेत जखडले गेले असते तेव्हा त्यास त्या शृंखला तोडून स्वतंत्र होण्यासाठी सर्व संधीत जी
अत्यंत अनुकूल संधी सापडण्यासारखी असते ती तेव्हाच होय की जेव्हा ते परकीय बलाढय राष्ट्र किंवा साम्राज्य त्याहूनही बलाढय राष्ट्र किंवा समबल अशा कोण्या अन्य शक्तीशी निकराच्या युध्दात गुंतलेले असते. -(श्रध्दा,१९२८फेब्रु.)
प्रत्येक परतंत्र राष्ट्राने आपली अंतर्गत संघटना अशा बेताने आणि इतक्या आधीपासून केली पाहिजे की त्या परकीय साम्राज्याचे दुसर्‍या कोणत्या शक्तिशाली राष्ट्राशी युध्द जुंपताच आपले साह्य ह्या किंवा त्या पक्षाला देता येण्याची समर्थता आंशिकत: त्याचे अंगी उत्पन्न झाली असली पाहिजे आणि ते सहाय्य या किंवा त्या पक्षालाही हवेसे वाटावे किंवा अपरिहार्य वाटावे इतके प्रबळ असले पाहिजे. - (श्रध्दा, १९२८ फेब्रु.)
आंतरराष्ट्रीय राजकारण
प्रत्येक परतंत्र परंतु स्वातंत्र्योन्मुख आंतरराष्ट्रीय राजकारण असतेच असते. - (१९२७ श्रध्दा, २५ सप्टेंबर)
सशस्त्र चळवळीकडे का वळलो ?
मानवता ही श्रेष्ठतर देशभक्ती असल्यामुळे जेव्हा मनुष्यजातीचा एक भाग स्वत:चे महत्व अवास्तवपणे वाढवीत आहे व एकंदर मानवाच्या जीवनासच वाढत जाणार्‍या विषारी कर्करोगाप्रमाणे धोका देत आहे असे पाहून आम्ही अस्वस्थ झालो तेव्हा इतर परिणामकारक उपाय नसल्यामुळे आम्हांला शस्त्रवैद्याचा चाकू हातात घेणे भाग पडले. हा उपाय तीव्र वाटला तरी शेवटी दयाळू होता. शक्तीचा प्रतिकार शक्तीने करीत असताना आम्ही हिंसेचा मनापासून तिरस्कार केला व आजही करतो. - (१९२० ले.अं., स.सा.वा. ५: ४९०)
आमचा माथा फिरला म्हणून तर
अखिल हिंदी लोकांचे जे ध्येय त्याच ध्येयासाठी जर आम्ही हातात शस्त्र घेतले तर आम्ही अत्याचारी झालो? तुमच्यासाठी जे लोक फासावर गेले त्यांना तुम्ही अत्याचारी व माथेफिरु म्हणता? आमचा माथा फिरला म्हणून तर हा देश फिरला आहे ! - (१९३८ स.सा.वा. ४ : ४२२)
प्रथम मानसिक क्रांती, मग वास्तविक क्रांती
कोणत्याही प्रबुध्द क्रियेचा आरंभ प्रबुध्द संकल्पातच असणार ! यास्तव अभिनव भारताच्या कार्यक्रमाचे मी प्रथमपासून मन:प्रवर्तन आणि शरीरप्रवर्तन, राष्ट्राची मानसिक क्रांती आणि मग वास्तविक क्रांती, प्रबुध्द संकल्प आणि मग प्रबळ क्रिया, मन:प्रचार आणि कृतिप्रचार अशा अनुक्रमाने विभागला होता. - (१९४९ मा.आ., स.सा.वा. १ : २५७)
अभिनव भारताचा राष्ट्रीय संकल्प
... हिंदुस्थानास स्वतंत्र करावयाचे, हिंदुस्थानास एकराष्ट्र करावयाचे, हिंदुस्थानास लोकसत्ताक करावयाचे या सूत्रांसह चवथे सूत्र हे ही घोषित केले जाई की हिंदीस राष्ट्रभाषा करावयाची, नागरीस राष्ट्रलिपी करावयाची ! - (१९२७ मा.ज., स.सा.वा. १ : ६३४)
निष्ठावन्त अल्पसंख्याक गट स्वातंत्र्य मिळवतो
इंग्रजांचे दहापाच लोक मारले की ते पळतील अशी दुधखुळी समजूत आम्ही केव्हाही करुन घेतली नव्हती. पण आमची निष्ठा असे की, तीस कोटी लोकांचे हे राष्ट्र, यातील सर्वजण जरी कधीच उठले नाहीत, उठणार नाहीत, तरी दोन लक्ष वीर जरी छाप्यांच्या पध्दतीने, गुप्त संघटनेने, गनिमी काव्याने, अखंड अदम्य, अविश्रांत वृकयुध्द लढू शकतील तरी आपले राष्ट्रीय स्वातंत्र्य संपादू शकतीलच शकतील. -(१९४९ मा.आ.,स. सा. वा. १ : २५५,२५६)
सद्य:स्थितीत राष्ट्रव्यापी सशस्त्र क्रांतीचा विचार अशक्य
जेव्हा एखाद्या परतंत्र देशाचा प्रतिपक्षी आपल्या काही प्रबळ शत्रूंशी गंभीर युध्दात अडकलेला असतो तेव्हा आपले स्वातंत्र्य प्रस्थापित करण्यासाठी सशस्त्र उठाव करणे हा पहिला व सर्वात परिणामकारक मार्ग त्या परतंत्र देशाला सुचला असता. परंतु आपण नि:शस्त्र, असंघटित व ऐक्यहीन असल्यामुळे सध्याच्या परिस्थितीत इंग्लंडविरुध्द राष्ट्रव्यापी सशस्त्र उठावाचा विचार पूर्णपणे विचारबाह्य आहे. हिंदुसभेला, काँग्रेसला किंवा हिंदुस्थानातील इतर सार्वजनिक व प्रकट संस्थेला तिच्या घटनेनुसार व तिच्या ध्येय आणि उद्दिष्टांनुसार आखून घेतलेल्या कार्यक्षेत्रात प्रकट व्यासपीठावर कोणत्याही सशस्त्र प्रतिकाराचा प्रश्न चर्चेचा विषयसुध्दा होऊ शकत नाही. म्हणून सध्याच्या परिस्थितीत हिंदुमहासभेच्या संघटनेच्या विद्यमाने सशस्त्र प्रतिकाराचा समावेश आलेल्या कोणत्याही कार्यक्रमाचा विचार न करणे, नैतिक कारणांनी नव्हे तर व्यवहारी राजकारणासाठी आम्हांस भाग पडले आहे. - (१९४० हिं.रा.द., स.सा.वा. ६ : ४२१)
स्वातंत्र्य संपादनानंतर क्रांतिप्रवृत्तीचे विसर्जन
परसत्तेच्या आपत्तीतून आपल्या राष्ट्राचे स्वातंत्र्य-संपादन करण्यास्तव प्रक्षोभ, असंतोष, उत्क्षोभ, निर्बंधभंग, शस्त्राचार, गुप्त कट इत्यादि साधने योजणारी विध्वंसक क्रांतिप्रवृत्ती त्या कालापुरतीच काय ती धर्म्य असते; परंतु जनतेत ती क्रांतिप्रवृत्ती जर तशीच मूळ धरुन राहू दिली तर केव्हा केव्हा आपध्दर्मालाच नित्यधर्म समजण्याची भयंकर भूल जनतेच्या हातून घडते आणि त्यामुळे राज्यक्रांती यशस्वी झाल्यानंतरही राष्ट्रात ही विध्वसंक बेबंदशाही तशीच चालू राहते. त्यामुळे राज्यक्रांतीनंतर घटनात्मक स्वराज्य अशक्य होऊन अपक्रांती नि अराजकता माजते.
... जेव्हा स्वातंत्र्य संपादन हे आपले प्रथम साध्य सिध्द होते तेव्हा सशस्त्र वा नि:शस्त्र प्रतिकारक जनतेत संचरविलेल्या वरील सर्व विध्वंसक क्रांतिप्रवृत्तीचे तत्काल विसर्जन करणे हे आपल्या यशस्वी झालेल्या राज्यक्रांतीचे अंतिम कर्तव्य होय. कारण आता आपले साध्य स्वातंत्र्यसंरक्षण हे आहे, राष्ट्रसंवर्धन हे आहे. आता निर्बंधतुच्छता नव्हे, तर निर्बंधशीलता, विध्वंसक नव्हे तर विधायक प्रवृत्ती, हा राष्ट्रधर्म आहे. - (१९५२ स.सा.वा. ८ : ४९६)

सुख-समृद्धीसाठी सोपे उपाय!

Written By Admin on Monday, October 3, 2011 | 4:08 PM

जीवनात सुख आणि समृद्धी मिळावी असे प्रत्येक मनुष्याच स्वप्न असतं. एस्ट्रोमध्ये असे बरेचसे उपाय आहे ज्यांना नियमितपणे केल्याने तुम्ही नक्कीच सुख आणि यश मिळवू शकता.
घरातील प्रत्येक सदस्यांना सूर्योदयाच्या आधी जाग आली पाहिजे व त्यांनी सूर्याचे दर्शन केले पाहिजे. त्याच वेळेस जोराने गायत्री मंत्राचे उच्चारणं केल्याने घरात असणारे वास्तुदोष दूर होतात.
सूर्य दर्शनानंतर सूर्याला पाणी, पुष्प आणि अक्षतांचे अर्घ्य द्यायला पाहिजे.
झोपेतून उठल्यावर दोन्ही पाय जमिनीवर एकाच वेळेच ठेवायला पाहिजे आणि त्याच वेळेस आपल्या इष्ट देवाची आराधना करून आपल्या हातांना तोंडावरून फिरवायला पाहिजे.
अंघोळ व पूजा सकाळी 7-8च्या दरम्यान केली पाहिजे.
घरात तुळस आणि आकड्याचा रोप लावावे आणि त्याची नियमित सेवा केली पाहिजे.
पक्ष्यांना दाणा द्यावा.
शनिवारी व अमावास्यांच्या दिवशी संपूर्ण घराची स्वच्छता करून घरातील पसारा बाहेर काढून जोडे-चपलांचे दान केले पाहिजे.
अंघोळ केल्यानंतर बाथरुम नेहमी स्वच्छ करावे.
जेवढे जमेल तेवढे भाची-भाच्यांना भेटवस्तू दिली पाहिजे.
घरात जेवण तयार करताना गाय आणि कुत्र्याचा भाग जरूर वेगळा काढावा.
बुधवारी कुणालाही उधार नाही द्यायला पाहिजे, ते परत मिळणे अशक्य असते.
राहू काळात कुठलेही शुभ कार्य सुरू नाही केले पाहिजे.
घरातील प्रत्येक सदस्याने आपल्या इष्ट देवाचे जप व पूजन जरूर केले पाहिजे.
घरातील सदस्यांनी अन्न, वस्त्र, तेल, अध्ययन सामुग्री इत्यादींचे दान केले पाहिजे. दान केल्यानंतर दुसऱ्यांकडे त्याचा उल्लेख करणे टाळावे.
आपल्या राशी किंवा लग्न स्वामीच्या ग्रहाच्या रंगाची एखादी वस्तू नेहमी आपल्या जवळ ठेवायला पाहिजे.

तुम्ही भाग्यवान आहात काय?

तुम्ही भाग्यवान आहात काय?
तुम्ही भाग्यवान आहात की नाही हे तुमची जन्मपत्रिका बघून सांगता येते. पण पत्रिका नसल्यास तुम्ही तुमच्या शारीरिक लक्षणांच्या मदतीने याची माहिती घेऊ शकता.
तुम्ही भाग्यवान असाल तर तुमच्यामध्ये खालील वैशिष्ट्ये आढळतील :
1. कपाळ मोठं असणे आणि त्यावर तीन सरळ रेषा असल्यास व कपाळावर केस पुढे गोल वळून आले असल्यास.
2. डोळे मोठे व त्यात तेज असल्यास.
3. नाक पातळ व सरळ असल्यास.
4. कान मोठे आणि पुढे निघालेले असतील तर तुम्ही नक्कीच भाग्यवान आहात
5. ओठ नैसर्गिकरित्या नाजुक, पातळ व गुलाबी असल्यास.
6. दात एकसारखे असल्यास, त्यांच्या रिकामी जागा नसल्यास किंवा अगदीच कमी असल्यास.
7. जिभेचा रंग गुलाबी आणि ती पुढून पातळ असली तर तुम्ही भाग्यवान आहात.
8. भुवयांचा रंग केसांपेक्षा हलका असल्यास आणि त्यावर केस कमी असाल्यास भाग्यवान आहात. दोन्ही भुवया जोडलेल्या असल्यास नशीबवान आहात.
9. हात गुडघ्यापर्यंत किंवा त्याखाली येत असतील तर तुम्ही नक्कीच भाग्यशाली आहात.
वर दिलेली लक्षणे तुमच्या शरीरात असतील तर तुम्ही नक्कीच भाग्यवान म्हणून जन्माला आलेले आहात. तुम्हाला फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. ज्या लोकांच्या शरीरात ही वैशिष्ट्ये असतात, त्यांचा भाग्योदय होतो. त्यासाठी त्यांना अधिक मेहनत करावी
लागते.

उत्तम ईश्वरवंचित विषयानंद

निराधाराचे बनावे सहायक आणि सदाचारचे बनावे विधायक
उत्तानपाद नावाचा एक राजा होऊन गेला. त्याला दोन राण्या होत्या. एक सुरूची, दुसरी सुनिती. सुरूची राजाची लाडकी, तर सुनीती उपेक्षित. एक दिवस राजा सुरूचीचा मुलगा उत्तम याला मांडीवर घेऊन बसला होता. त्याच वेळेस सुनीतीचा मुलगा ध्रुव तिथे आला व राजाच्या मांडीवर बसला. तेव्हा सुरूचीने त्याला झिडकारले. तेव्हा त्याने आपली आई सुनीतीला कारण विचारले व तिच्याच सांगण्यानुसार ध्रृव वनात गेला व त्याने तपश्चर्येने ईश्वर प्राप्ती करून घेतली.
पाय वर व डोके खाली करून आईच्या गर्भात झोपणारा प्राणी म्हणजेच उत्तानपाद. सुरूची म्हणजे इंद्रियांच्या साहाय्याने भोग भोगणे, सुनीती म्हणजे वासनेवर नियंत्रण ठेवणारी शक्ती. उत्तम (उद् + तम) ईश्वरवंचित विषयानंद, आणि ध्रृव अविचल शांती देणारा ब्रम्हानंद. जीवाला रूची म्हणजे भोग गोड वाटतात. पण सुनीती म्हणजे वासनेवर नियंत्रण ठेवणे आवडत नाही म्हणून जीव इंद्रियाकडून मिळणार्‍या विषयानंदात रमतो. आणि नीतीमय सयंमी जीवनात मिळणार्‍या ब्रम्हानंदाची उपेक्षा करतो. परंतु त्यामुळेच तो चौर्‍यांशीच्या फेर्‍यात अडकतो.
(श्रीमदभागवत या महान ग्रंथाचे सार सांगणाऱ्या परमपूज्य डोंगरे महाराजकृत भागवत प्रसादी या पुस्तकाचा भावानुवाद)
 
Support : Creating Website | Johny Template | Mas Template
Copyright © 2012. PRAJAWAANI - All Rights Reserved
Template Created by Creating Website Published by Mas Template
Proudly powered by Blogger