Latest Post

Showing posts with label फिचर. Show all posts
Showing posts with label फिचर. Show all posts

आशा भोसलेंना अक्षय मोहंती सन्मान

Written By Admin on Monday, October 10, 2011 | 3:02 AM


भुवनेश्‍वर - प्रख्यात पार्श्‍वगायिका आशा भोसले यांची संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल यंदाच्या अतिशय प्रतिष्ठेच्या अक्षय मोहंती सन्मानसाठी निवड करण्यात आली. एक लाख रुपये रोख आणि कार्याचा गौरव करणारे विशेष पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रख्यात ओरिया गीतकार आणि संगीतकार अक्षय मोहंती यांच्या पुण्यतिथीनिमित्त येत्या १२ ऑक्टोबर रोजी आशा भोसले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी मन्ना डे, गुलजार आणि इलिया राजा यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
स्रोत: तरुण भारत, 10/9/2011 http://vrittabharati.in/

अडवाणींचा सरकारवर पुन्हा हल्लाबोल


नवी दिल्ली - लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जन्मस्थळावरून आपली रथयात्रा सुरू करण्यापूर्वी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
भ्रष्टाचारविरोधी रथयात्रा काढत असलेल्या अडवाणी यांनी युपीए सरकार भ्रष्टाचारासाठी जबाबदार असल्याचे सांगितले आहे. या सरकारच्या काळात लोकशाहीची हानी झाली असून सर्वत्र भ्रष्टाचार फोफावलेला दिसत आहे. हेच कारण आहे की देशातील जनतेत असंतोष व संताप भरलेला आहे. परदेशात असलेला काळा पैसा भारतात परत आणण्यात सरकारने जी निष्क्रियता दाखवली आहे त्यामुळे जनतेत या सरकारविषयीचा विश्‍वास कमी झाला आहे.
रथयात्रेपूर्वी दिल्लीत एका पत्रपरिषदेत बोलताना अडवाणी म्हणाले की रथयात्रेदरम्यान भ्रष्टाचाराच्या मुद्याबरोबरच महागाई, निवडणूक सुधारणा या मुद्यांवरदेखील भर देण्यात येणार आहे. काळा पैसासंदर्भात श्‍वेतपत्रिका जारी करण्याची मागणी करत रथयात्रेत विदेशातील काळा पैसा परत आणण्यासंदर्भात व यात गुंतलेल्या लोकांविरुद्ध कारवाई करण्यासंदर्भात कठोर पावले उचलण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही अडवाणी यांनी सांगितले. अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचारविरोधी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचेही अडवाणी यांनी सांगितले.
स्रोत: तरुण भारत, 10/10/2011

गझल सम्राट जगजीतसिंह कालवश

 मुंबई - प्रख्यात गझल गायक जगजीतसिंह यांचे आज सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात निधन झाले. ते ७० वर्षांचे होते.
जगजीतसिंह यांना ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आपल्या मखमली आवाजामुळे गझल गायकीत त्यांनी आपले स्थान निर्माण केले होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही गाणे गायले होते.
जगजीतसिंह यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९४१ रोजी राजस्थानच्या गंगानगरमध्ये झाला होता. बालपणीच त्यांना संगीताचा वारसा आपल्या वडिलांकडून मिळाला होता. १९६५ मध्ये ते मुंबईत आले आणि त्यांचा संघर्ष सुरू झाला. आपल्या मेहनतीने त्यांनी चित्रपटसृष्टीत लवकरच आपले स्थान निर्माण केले. आपल्या गाण्याच्या शैलीने त्यांनी रसिकांना भुरळ घातली आणि रसिक त्यांच्या गाण्याचे दिवाने झाले. सामान्य माणसाला गझलची आवड जगजीतसिंह यांच्यामुळे निर्माण झाली. गझलसारखा कठीण उर्दूतला प्रकार त्यांनी रसिकांसाठी उलगडून दाखवला.
‘प्रेमगीत’, ‘अर्थ’ या चित्रपटातील गाणी कोण विसरू शकेल. त्यांनी अनेक गझल अलबम तयार केले. त्यांच्या प्रत्येक अलबमने यशाचे शिखर गाठले. आपल्या एकुलत्या मुलाच्या निधनाने कोलमडलेले जगजीतसिंह पुन्हा बळाने उभे राहिले आणि त्यांनी संगीतक्षेत्रात आपले संशोधन सुरू केले. त्यांचे संगीतक्षेत्रातील योगदान अमूल्य आहे.

गझल प्रकाराला सामान्य लोकांमध्ये लोकप्रिय बनवण्यात जगजीतसिंह यांचे मोठे योगदान होते. त्यांनी ५० पेक्षा जास्त अलबममध्ये गाणी गायली आहेत. त्यात गझलचे प्रमाण जास्त आहे. तुमको देखा तो ये खयाल आया, होठों से छुलो तुम मेरा गीत अमर कर लो, वो कागज की कश्ती वो बारीश का पानी या त्यांच्या गझल फारच लोकप्रिय झाल्या. हिंदीबरोबरच त्यांनी पंजाबी, बांगला, उर्दू, गुजराती, सिंधी आणि नेपाळी भाषेत गाणी व गझल गायल्या आहेत. २००३ मध्ये भारत सरकारने कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी पद्भूषण पुरस्काराने सन्मानित केले.


गझल गायकीला नवा आयाम देणार्‍या या सम्राटाला अभिवादन.
स्रोत: तरुण भारत, तारीख: 10/10/2011  http://vrittabharati.in/

‘शालेय क्रिकेट हेच भारतीय क्रिकेटचे भवितव्य ’

Written By Admin on Monday, October 3, 2011 | 9:27 AM

सीसीआयच्या खेळपट्टीवर कपिल देव यांची चौफेर फटकेबाजी
मुंबई, २९ सप्टेंबर
altभारतीय क्रिकेटने नेहमी अव्वल स्थानावर राहायला हवे. आक्रमकपणा क्रिकेटमध्ये दिसायला हवा. आपला देश महात्मा गांधीजींचा आहे. परंतु क्रिकेटच्या मैदानावर खेळताना आपण हिटलरचे अनुकरण करायला हवे, असे बोल भारताचा माजी संघनायक कपिल देवने सुनावले. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या दिलीप सरदेसाई स्मृती वार्षिक व्याख्यानाप्रसंगी ‘भारतीय क्रिकेटचे भविष्य’ या विषयावर कपिलने जोरदार फलंदाजी करीत आपल्या खडय़ा बोलांनी चौकार-षटकारांची आतषबाजी केली आणि उपस्थितांची मनसोक्त दाद मिळवली.
कपिल पुढे म्हणाले की, विश्वचषक जिंकल्यानंतर जग संपत नाही, तिथेच प्रवासाला सुरुवात होते. भारताने विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम दाखवला. परंतु त्यानंतर किमान हा ऐतिहासिक आनंद साजरा करायलाही अवधी मिळाला नाही आणि पुन्हा चार दिवसांनी आयपीएल क्रिकेट सुरू झाले. तीन वर्षांच्या मेहनतीनंतर हे फळ मिळाले होते. विश्वचषकानंतर किमान महिनाभर तरी देशात क्रिकेट खेळण्याची आवश्यकता नव्हती.
भारताचे क्रिकेटपटू आणि बोर्ड जगात सर्वात श्रीमंत आहे. अन्य देशांतील क्रिकेटपटूंना इतका पैसा मिळत नाही. भारतीय क्रिकेटची अर्थव्यवस्था पाहिली की गर्व वाटतो. अन्य खेळांनीही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा आदर्श घ्यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले. शालेय क्रिकेट चांगले घडत राहिले, तर भारतीय क्रिकेटचे भविष्य उज्ज्वल आहे, असे त्यांनी सांगितले.
बीसीसीआयचा मी आदर करतो. क्रिकेटपटूंसाठी त्यांनी अनेक गोष्टी केल्या आहेत. माझा काही काळ बोर्डाशी बेबनाव झाला होता. परंतु आपले पालकांशीसुद्धा पटेनासे होतेच की.. असे कपिल देव यांनी यावेळी सांगितले.
गेल्या १५ वर्षांत भारतीय क्रिकेटने जवागल श्रीनाथ, व्यंकटेश प्रसाद, झहीर खानसारखे अनेक चांगले वेगवान गोलंदाज घडवले आहेत. हे आणखी कसे घडवता येतील याचा बीसीसीआयने गांभीर्याने विचार करायला हवा. आताचे वेगवान गोलंदाज जिममध्ये धावतात, त्यांनी मैदानावर धावणे आवश्यक आहे, अशी कानउघाडणी कपिल यांनी केली.
वेगवान गोलंदाजांना सहा तास मेहनत घ्यावी लागते, ते कामगारासारखे राबतात. परंतु फलंदाजांना दोन तास कष्ट करावे लागतात, ते एखाद्या अधिकाऱ्याप्रमाणे वागतात. आपल्या देशात अधिकारी होण्यातच लोकांना जास्त रस आहे, हेच आपले दुर्दैव आहे, असे ते पुढे म्हणाले.
लॉर्ड्स कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाज दमले म्हणून चक्क कप्तान महेंद्रसिंग धोनीला यष्टिरक्षकाचे ग्लोव्हज काढून गोलंदाजी करायला लागली. हे योग्य धोरण नाही. मी असतो तर इशांत शर्मा आणि प्रवीण कुमारला तुम्ही दमलात का, असे अजिबात विचारले नसते. त्यांना २५ षटके सहज गोलंदाजी करायला लावली असती, असे कपिल यांनी सांगितले.
निवड समिती सध्या विभागीय पद्धतीने कार्यरत आहे. तीन-चार प्रमुख खेळाडूंचा समावेश आणि त्यांच्यासमवेत १० अन्य सदस्य अशी निवड समितीची रचना हवी. या सदस्यांनी स्थानिक क्रिकेट बारकाईने जाऊन पाहणे आवश्यक आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
देश आणि आयपीएल क्लब या वादाबाबत कपिल देव यांनी भूमिका मांडताना सांगितले की, या दोन्ही गोष्टी एकाच संघटनेच्या अखत्यारित येतात. मग दोन्हीमधून मिळणाऱ्या पैशांमध्ये फरक का? एखादी संघटना क्लबसाठी खेळताना देशासाठी खेळण्यापेक्षा अधिक पैसे कसे काय देऊ शकते. मला तरी हे मान्य नाही.   

आंदोलनाला बिचकलेल्या कॉंग्रेसकडून अण्णांना 'राष्ट्रपती' पदाची ऑफर?

पुणे: भ्रष्टाचाराविरोधात सगळ्या देशाला एकत्र आणून आवाज उठवणारे ज्येष्‍ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना कॉंग्रेस सरकारकडून 'राष्ट्रपती' पदाची ऑफर दिली जाण्याची शक्यता आहे. अण्णा हजारे यांना कॉंग्रेस सरकारने राष्‍ट्रपदी पदाची ऑफर दिली जाणार असल्याचे वृत्त एका स्थानिक दैनिकाने बुधवारी प्रसिध्द केले होते. अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिध्दी या अण्णांच्या गावी सध्या अनेक बड्या राजकीय नेते हजेरी लावत आहेत. या पार्श्वभूमीवर अण्णांना कॉंग्रेसकडून ही ऑफर दिली जाणार असल्याचे वृत्त प्रसिध्द झाल्याने वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.
अण्णांना राष्ट्रपती म्हणून राष्ट्रपती भवनात बसवून त्यांचे भ्रष्टाचारविरोधात सुरु असलेले आंदोलन चिरडून काढण्याची कॉंग्रेसची नवी खेळी आहे. परंतु, या वृत्ताला दुजोरा मिळू शकला नाही.
राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा कार्यकाळ पुढील वर्षी समाप्त होत आहे. राजधानी दिल्ली‍त कॉग्रेस नेत्यांच्या झालेल्या बैठकीत अण्णांना राष्ट्रपती पद देऊन त्यांची मनधरणी करावी. अण्‍णा हजारे हे राष्‍ट्रपती झाल्याने महाराष्ट्रातील जनता खुश होईल. आणि देशात एक चांगला संदेश जाईल. अशी कॉंग्रेसची  'आयडीया' आहे. विशेष म्हणजे कांग्रेस विरोधात असलेल्या देशातील जनतेलाही या माध्यमातून नियंत्रणात ठेवता येईल.
अण्णांना कॉंग्रेस सरकारकडून राष्‍ट्रपतीपदाची ऑपरचे वृत्त ही अफवा असल्याचे अण्णांचे सहाय्यक संजय पठाडे यांनी सांगितले. अण्णा कॉंग्रेसकडून आलेला असा कोणताही प्रस्ताव स्विकारणार नाहीत. अण्णा हजारे कॉंग्रेसच्या कोणत्याही मोहाला बळी पडणार नाहीत, असा विश्वास राळेगण सिध्दीचे  सरपंच जयसिंह मपारी यांनी व्यक्त केला आहे. कोणताही केंद्रीय मंत्री अण्णांकडे असा प्रस्ताव आणण्याचे धाडसही करणार नाही, असेही मपारी म्हणाले.

ममता बॅनर्जींचा दणदणीत विजय

कोलकता - पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भवानी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या. त्यांनी आपले नजीकचे प्रतिस्पर्धी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवार नंदिनी मुखर्जी यांचा पराभव केला.
पश्‍चिम बंगालमध्ये गेल्यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांचा पराभव करून तृणमूल कॉंग्रेस सत्तेवर आला होता. रेल्वेमंत्री असलेल्या बॅनर्जी यांनी दिल्ली सोडून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. सहा महिन्यात निवडून यायचे असल्याने त्यांनी भवानीनगरमधून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. या मतदारसंघाचे आमदार सुब्राता बॅनर्जी यांनी राजीनामा दिल्याने येथे गेल्या 25 सप्टेबररोजी पोटनिवडणूक झाली. ममता बॅनर्जी यांचा 54,213 हजार मतांनी दणदणीत विजय झाला.

कॉंग्रेसचे दात घशात घालू - उद्धव ठाकरे

मुंबई - मुंबई महापालिकेचे विभाजन करण्याच्या मागणीवरून आज शिवसेना, भाजप व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह सर्वच विरोधकांनी टीकेचे रान उठविले. मुंबई तोडण्याची भाषा करणाऱ्यांचे दात त्यांच्याच घशात घालू, असा सडेतोड इशारा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी एकीकडे दिला; तर हे पिल्लू ज्याने कोणी सोडले तो पुढे येऊ दे, मग मी बोलतो, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली. भाजप लोकशाही मार्गाने या मागणीस विरोध करेल, असे भाजपचे मुंबई अध्यक्ष गोपाळ शेट्टी यांनी ठणकावून सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही या मागणीला ठाम विरोध दर्शविला असून, मुंबई महापालिकेच्या विभाजनाची आवश्‍यकता नसल्याचे ठाम मत उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई महापालिकेचे शहर व उपनगर असे विभाजन करावे व उपनगरासाठी स्वतंत्र आयुक्त नेमावा, अशी मागणी कॉंग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी काल सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीत केली होती. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या साक्षीने करण्यात आलेल्या या मागणीला शिवसेनेने कडाडून विरोध केला. आज यावर सर्वच राजकीय पक्षांनी तीव्र शब्दांत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
दात घशात घालू - उद्धव ठाकरे
कॉंग्रेसचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, हे या मागणीवरून सिद्ध होते. कॉंग्रेसच्या नेत्यांशीच लढून मराठी माणसाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळविला. आज संयुक्त महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात कॉंग्रेसकडून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होतो हे महाराष्ट्राचे दुर्दैव. कॉंग्रेसचा हा डाव शिवसेना कदापि यशस्वी होऊ देणार नाही. कॉंग्रेसचे हे दात घशात घातल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, अशी टीकेची झोड शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी उठविली.
मुंबईचे पालकत्व एकाच संस्थेकडे ठेवायला हवे हे आम्ही खूप वर्षांपासून सांगत आलो आहोत. मुंबईतील सर्व बाबींसाठी जर महानगरपालिकेला जबाबदार धरले जात असेल, तर महानगरपालिकेला तसे अधिकारही द्यायला हवेत. याउलट एमएमआरडीएसारख्या संस्था महानगरपालिकेच्या डोक्‍यावर राज्य करतात. कॉंग्रेसची ही पद्धत आहे, की एखाद्या छोट्या माणसाकडून पुडी सोडायची आणि क्रिया-प्रतिक्रिया काय होतात ते पाहायचे. कॉंग्रेसचा मुंबई महाराष्ट्रापसून तोडण्याचा हा डाव मुंबईतील मराठी माणूस आणि शिवसेना कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असेही ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

पुन्हा बाबा रामदेवांचा हल्लाबोल

स्रोत: तरुण भारत 
फारूखाबाद, ३ ऑक्टोबर
भ्रष्टाचार आणि विदेशात असणारा काळा पैसा परत आणण्यासाठी केंद्र सरकारच्या  निष्क्रियतेवर पुन्हा एकदा रामदेव बाबांनी हल्लाबोल केला आहे. जे लोक काळा पैसा परत आणण्यात बाधा आणत आहेत, त्यांचाच काळा पैसा या विदेशी बँकांमध्ये जमा असून शकतो, अशी टीका केंद्र सरकारवर रामदेव बाबांनी केली आहे.
‘भारत स्वाभिमान यात्रा’वर असणार्‍या रामदेवबाबांनी आज सकाळी योगशिक्षण दिल्यानंतर केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. काळा पैसा भारतात परत आणण्यामध्ये अडचणी आणणार्‍या लोकांचाच पैसा विदेशी बँकांमध्ये जमा असू शकतो. असे नसते देशाच्या विकासासाठी हा पैसा परत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असते.
भ्रष्टाचाराचा मुद्दा खूप मोठा असून या भ्रष्टाचारात अडकलेल्या मोठ्या लोकांची नावे आश्‍चर्यकारकपण समोर येत आहेत. भ्रष्टाचाराने देश पोखरत चालला आहे. देशात वाढणार्‍या महागाईचे कारणदेखील भ्रष्टाचारच आहे. निष्क्रिय लोकांच्या हाती देशाची सत्ता असल्याचेही बाबा रामदेव यांनी सांगितले.

चित्रपट तयार होण्याआधीच कमावले १२५ कोटी

Written By Admin on Sunday, October 2, 2011 | 9:19 AM

चित्रपट तयार होण्याआधीच कमावले १२५ कोटी
स्रोत: तरुण भारत
 मुंबई, २ ऑक्टोबर - हृतिक रोशनचा आगामी चित्रपट ‘क्रीश-२’ने तयार होण्याआधीच १२५ कोटींची कमाई करून टाकली आहे.
हे असे कसे झाले, असे वाटेल. पण, आजकाल बड्या कलावंतांचे चित्रपट तयार होण्यापूर्वीच विकले जातात. ज्या कलावंतांच्या ‘चलनी नाण्या’विषयी वितरकांना विश्‍वास असेल अशांचे चित्रपट तयार होण्यापूर्वीच विकत घेतले जातात. ‘सिंघम’च्या यशाने अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘सन ऑफ़ सरदार’ याने ८० कोटी कमावले आहेत. हृतिकच्या ‘क्रीश’ला मिळालेले यश पाहता वितरकांनी याचा दुसरा भागही सव्वाशे कोटींना विकत घेतला आहे.

दहशतवादविरोधी लढ्यात पाकचे उपाय प्रभावी नाहीत : ओबामा

स्रोत: तरुण भारत
वॉशिंग्टन, २ ऑक्टोबर - पाकिस्तानला आम्ही दहशतवादविरोधी लढ्यात सहकारी मानून त्यांना यासंदर्भातील कारवाईची जबाबदारी सोपविली. पण, त्यांनी आजवर केलेले उपाय यादृष्टीने फारसे प्रभावी सिद्ध झालेले नाहीत, अशी माहिती अमेरिकी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी अमेरिकी कॉंग्रेसला दिली. याद्वारे त्यांनी पाकचा नाकर्तेपणा पुन्हा एकदा समोर आणला आहे. ओबामांच्या वतीने कॉंग्रेसला एक अहवाल पाठविण्यात आला आहे. त्यात लिहिले आहे की, २०१० मध्ये आलेल्या पुरानंतर चार महिने उलटले, पण आता पुन्हा दहशतवाद डोके वर काढताना दिसतो आहे. पाकिस्तानी सैन्याला दहशतवादाला चिरडणे शक्य झालेले नाही. एवढेच नाही, तर त्यांना अतिरेकी ठिकाणांपर्यंतही पोहोचता आलेले नाही. उलट, पाकच्या या अपयशामुळे तेथे अतिरेक्यांना सुरक्षित स्थान प्राप्त झाले आहे आणि तेथील सैन्याची स्थिती दिवसेंदिवस खालावतच आहे, असेही ओबामा म्हणाले. २५ पानांच्या या अहवालात यंदा जानेवारी ते ऑगस्टदरम्यानच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या दहशतवादविरोधी लढ्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला आहे. पाकसोबतचे संबंध ताणले ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर पाकिस्तानसोबतचे आपले संबंध ताणले गेल्याची कबुलीही ओबामांनी या अहवालाद्वारे दिली आहे.
 
Support : Creating Website | Johny Template | Mas Template
Copyright © 2012. PRAJAWAANI - All Rights Reserved
Template Created by Creating Website Published by Mas Template
Proudly powered by Blogger